खा. संजय राऊत यांच्या विरोधात सातारा बंद , राज्यात ठिकठिकाणी आंदोलन , उद्या सांगली बंदची हाक

शिवसेनेचे नेते खा .संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध व्यक्त करत साताऱ्यात आज उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. साताऱ्यात बाजारपेठ आणि ठिकठिकाणची दुकानं बंद ठेवण्यात आल्याने सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प झाले. उदयनराजेंच्या समर्थकांनी राजवाड्यातील गांधी मैदान ते साताऱ्यातील पोवई नाका असा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर उदयनराजेंसाठी काढण्यात आलेल्या रॅलीत दोन गाढवांच्या गळ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पाट्या टांगून निषेध व्यक्त करण्यात आला. सातारच्या बाजारपेठेतल्या नेहमीच्या गजबलेल्या ठिकाणी आज शांतता पाहायला मिळाली.
उदयनराजे यांच्या समर्थकांनी उर्त्फुतपणे बंदला पाठिंबा दिला. आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग लक्षणीय होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजप नेते उदयनराजे भोसले समर्थक आणि भाजपने आज सातारा बंद पुकारला आहे. तर सोलापूर, सांगली आणि नगरमध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
नवाब मलिक काय म्हणतात ?
दरम्यान राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीही या वादात उडी घेत , गादीचे वारस आणि रक्ताचे नाते हे वेगळे असते. देशातील संस्थांनामध्ये दत्तकपुत्रही राजे झाले आहे. आता त्यात कोण दत्तकपुत्र राजे झालेत हे माहिती नाही असे म्हटले आहे . देशातील बऱ्याच संस्थानिक घराण्यांनी दत्तक विधानानुसार गादीवर राजपुत्र विराजमान केले आहेत. त्या घराण्यांबाबतही संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले असतील. मात्र, तुम्हाला गादीचा वारस आहे की तुमचे आणि घराण्याचे नातं हे रक्ताचे नाते आहे, असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. त्यामुळे ज्यांना हा प्रश्न विचारला त्यांनीच उत्तर दिले पाहिजे असे मलिक यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मारहाणीच्या भाषेचा समाचार घेतला. तंगडी कोणीही कुणाचीही तोडू शकत नाही. धमकी देऊनही प्रश्न सुटत नसतात. त्यामुळे मूळ प्रश्नाला उत्तर देणे अपेक्षित असल्याचे मलिक यांनी सांगितले.
जाणता राजा म्हणजे शिवाजी महाराज नाही…
सर्व विषयांची जाण असणारा, असा ‘जाणता राजा’चा शाब्दिक अर्थ होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जाणता राजा’ म्हणजे आम्ही शिवाजी महाराज असा त्याचा अर्थ होत नाही. शरद पवार यांनी स्वत:ला ‘जाणता राजा’ असे कधीही म्हटले नसल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना कधीही सहन होऊ शकणार नसल्याचे ही त्यांनी ठणकावले. योगी सांगतात की मोदी आधुनिक शिवाजी महाराज आहेत. लेखक गोयल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते आणि ते सांगतात की मी माफी मागितली नाही. त्यामुळे वाद संपवण्यासाठी जावडेकर यांनी पुस्तक प्रकाशन झालेल्या ठिकाणी जाऊन पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करावे असे आवाहनही मलिक यांनी केले.