” आज के शिवाजी -नरेंद्र मोदी ” : महाराजांच्या आसपासही कोणी नाही , उदयनराजे यांची प्रतिक्रया , “जाणता राजा” उपमेचाही केला निषेध

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकावरून महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयन राजे भोसले यांनीही आपली संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे कि , ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कुणीही गाठू शकणार नाही, मात्र अलिकडे ‘जाणता राजा’ ही उपमाही दिली जाते. मी याचाही निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच आहेत. त्या सो कॉल्ड जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही, अशी टीका भाजपचे नेते, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली. या वेळी उदयनराजे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवरही जोरदार टीकास्त्र सोडले.
उदयनराजे पुढे म्हणाले कि , गोयल नावाच्या कुण्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मी ते वाचलेले नाही. वास्तविक या जगात महाराजांच्या उंचीपर्यंत कुणीही जाऊ शकणार नाही. एक युगपुरूष कधीतरी जन्माला येतो. ते म्हणजे शिवाजीराजे. तुलना करणाऱ्या लोकांची बुद्धी गहाण ठेवली आहे का?, असा सवाल करत तुलना करणाऱ्या या पुस्तकामुळे आपल्याला वाईट वाटल्याचे उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच या तुलनेमुळे वाईट वाटल्याचेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं तर सोडाच, पण त्यांच्या आसपासही कुणी जाऊ शकणार नाही. प्रत्येकजण महाराजांचे चरित्र वाचतो. आपण अनुकरण करू शकतो. विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. पण शिवाजी महाराज कुणीही बनू शकणार नाही, असे उदयनराजे म्हणाले. युगपुरुष फक्त एकदाच जन्माला येतो. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरूष आहेत. त्यांची तुलना कुणासोबतही होऊ शकत नाही. जाणता राजा फक्त शिवाजी महाराज आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
यानिमित्ताने पंतप्रधान मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बोलत असतानाच उदयनराजे यांनी ‘जाणता राजा’ या उपमेवरही भाष्य केले. या वेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. शिवस्मारक, आरक्षणासारखे प्रश्न जाणता राजा म्हणवणाऱ्यांनी प्रलंबित का ठेवले, असा सवालही या वेळी उदयनराजे यांनी केला आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ” जाणता राजा ” या शरद पवारांना दिलेल्या उपाधींबाबत उदयनराजेंनी टीका करताच ट्विट द्वारे जोरदार उत्तर देऊन या उपमेचे समर्थन करीत शरद पवार यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.