जगात होणा-या बालमृत्यूपैकी २७ टक्के बालमृत्यू , भारतात अलका गाडगीळ यांची माहिती

औरंंंगाबाद : जगात होणा-या बालमृत्यूपैकी २७ टक्के मृत्यू हे भारतात होत असल्याची माहिती युनिसेफच्या वतीने मंगळवारी (दि. १४) कार्यशाळेत देण्यात आली. युनिसेफ आणि चरखा या संस्थेच्या वतीने मंगळवारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती युनिसेफसाठी महिलांच्या आरोग्यासंबंधित विभागात काम करणा-या अलका गाडगीळ यांनी दिली.
गाडगीळ म्हणाल्या, ‘ भारतातील २२ टक्के बालमृत्यू हे टाळता येणारे आहेत. त्यासाठी जन्मानंतर तासाभरात नवजात बाळाला आईचे स्तनपान मिळायला हवे. आईच्या दुधामुळे ३ वर्षांत बाळाच्या मेंदूचा ९० टक्के विकास होतो. महिलांची गर्भवती अवस्थेपासून काळजी घेतली तर बालमृत्यूचे प्रमाण ब-याच अंशी कमी करता येईल. १९ टक्के बालमृत्यू हे डायरिया, निमोनियामुळे होतात, असेही त्यांनी सांगितले. पांडुरंग सुदामे यांनी ज्ञानेश्वरी, कुराणमधील आयत्यांच्या आधारे आईच्या दुधाचे महत्त्व विषद केले. मुलाच्या आयुष्यातील पहिले एक हजार दिवस महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गर्भवती अवस्थेतील २७० दिवस व नंतरच्या दोन वर्षातील प्रत्येकी ३७५ दिवस हे महत्वाचे असून या कालावधीत आईचे दूध, सहवास जास्तीत जास्त मिळाला तर मेंदूचा विकास होतो. गर्भवती अवस्थेत महिलेला योग्य आहार मिळाला नाही तर २० टक्के बालके अडीच किलो पेक्षा कमी वजनाची जन्माला येतात, असेही ते म्हणाले. जन्मानंतर मध देणे, टाळू माखने असे प्रकार टाळावेत, असेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत अलका गाडगीळ यांच्यासोबत डॉ. पांडूरंग सुदामे, सुजाता शिर्वेâ, ऋचा सत्तूर यांनी देखील मार्गदर्शन केले.