ह्रदयद्रावक : भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीवरून यात्रेला निघालेल्या चिमुरडीसह बापाचा करूण अंत , आई गंभीर जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर भीमा नदीवरील पुलावर भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने यात्रेसाठी गावी जाणाऱ्या बाप-लेकीचा करून अंत झाला तर आई गंभीर जखमी झाली. राजगुरुनगर येथे घडलेल्या या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि , निरगुडसर, ता. आंबेगाव येथील सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय-३५), त्यांची तीन वर्षाची चिमुरडी आरोही सतीश वळसे-पाटील आणि पत्नी जयश्री पाटील कुटुंबीय थापलिंग येथे यात्रेला निघाले होते. शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकने भीमानदी पुलावर वळसे- पाटील यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये सतीश आणि आरोही हे दोघेही ट्रकच्या पाठीमागील चाकाच्या खाली येऊन जागीच ठार झाले तर जयश्री या लांब फेकल्या गेल्या. त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक नागरिकांनी तिघांना तत्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सतीश आणि आरोही या बापलेकीला मृत घोषित केले. सतीश वळसे पाटील हे काळेवाडी (पिंपरी) येथे एका खासगी कंपनीत नोकरीला होते. या घटनेमुळे निरगुडसर गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रकचालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय-४०, रा. वाळवी, ता. सिन्नर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.