बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ व्हायरल दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा पुढाकार सोशल मिडीयावर प्रसार

सिडको पोलिसात पहिला गुन्हा दाखल
छावणी, सातारा पोलिसातही तक्रारी
बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करणा-यांविरुध्द दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने ठोस पाऊल उचलले आहे. राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चाईल्ड पॉर्नग्राफीविरुध्द गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याप्रकरणी पहिला गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर छावणी व सातारा पोलिस ठाण्यात देखील याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोला बेपत्ता आणि शोषित मुलांच्या राष्ट्रीय केंद्राकडून काही लैंगिक शोषणाचे व्हिडीओ आणि फोटोग्राफ्स प्राप्त झाले होते. हे व्हिडीओ एकाने फेसबुकसह इतर सोशल मिडीयावर व्हायरल केले. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर दिल्लीच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या किळसवाण्या प्रकाराबाबत कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना १८ डिसेंबर २०१९ रोजी केल्या. त्यानुसार, राज्यातील सर्वच सायबर क्राईम पोलिस ठाण्यांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यावरुन सिडको पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सिडकोचे पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले. तसेच छावणी व सातारा पोलिस ठाण्यात देखील यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सायबर क्राईमचे पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.
………
डिजीटल स्वरुपाचे पुरावे….
सोशल मिडीयावर व्हायरल झालेले व्हिडीओ डिजीटल स्वरुपाचे आहेत. त्यामुळे एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यास तांत्रिक पुरावे उपलब्ध होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. संवेदनशील व गंभीर स्वरुपाचे गुन्हे असल्याने ते तात्काळ दाखल करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहेत. गुन्ह््याच्या अनुषंगाने तांत्रिक मदतीची आवश्यकता असल्यास ठाण्यातील प्रभारींनी सायबर पोलिस ठाण्याची तांत्रिक मदत घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
……..
पॉर्नोग्राफीला आळा घालण्यासाठी……
विदेशात चाईल्ड पॉर्नोग्राफीला बंदी आहे. त्या धर्तीवर देशात देखील बंदी घालण्यात यावी, या अनुषंगाने पाऊले उचलण्यात आली आहेत. बालकांच्या लैंगिक शोषणासंदर्भात सोशल मिडीयावर अश्लिल व बिभित्स व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात व्हिडीओच्या सीडीज तयार केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीची माहिती समोर येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी देखील त्याची काळजी घ्यावी.
कैलास देशमाने, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, औरंगाबाद
……..