साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासाची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि शिर्डीकरांची भावना…

औरंगाबाद दौऱ्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी या साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करून तीर्थक्षेत्र विकास योजनेतून पठारी येथे विकास कामे करण्याची घोषणा केली होती. मात्र शिर्डीकर भक्त साईबाबांचे नेमके जन्मस्थळ माहिती नसल्याचे शिर्डीकर मानत असल्याने येथील ग्रामस्थांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे.
शिर्डीकरांच्या म्हणण्यानुसार साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केले नाही. अलीकडच्या काळात यासंबंधी पाथरीचा उल्लेख होऊ लागल्याने शिर्डीतून त्यासाठी वेळावेळी विरोध झाला आहे. साईसमाधी शताब्दी सोहळ्यातही राष्ट्रपतींच्या भाषणात हा उल्लेख आला होता. त्यावेळीही ग्रामस्थांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासोबत राष्ट्रपतींची भेट घेऊन खुलासा केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत बोलताना कमलाकर कोते म्हणाले कि , पाथरीच्या विकासाला मदत करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणी शिर्डीकरांचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे साईबाबांचे भक्त आहेत, त्यांनी शिर्डीकरांच्या या भावना जाणून घ्याव्यात, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्यासंबंधीची भूमिका ग्रामस्थांकडून शनिवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.