भीमा कोरेगाव हिंसाचार चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यास मिलिंद एकबोटे यांचा नकार

समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून आयोगासमोर साक्ष नोंदविल्यास त्याचा या खटल्यावर परिमाण होऊ शकतो, असा दावा करून एकबोटे यांनी साक्ष देणार नसल्याचे शुक्रवारी आयोगासमोर सांगितले.
राज्य सरकारने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणीकोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन केला आहे. आयोगाकडून शुक्रवारी मुंबईत सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी एकबोटे हे आयोगासमोर हजर झाले. मात्र, त्यांनी साक्ष देण्यास नकार दर्शविला. या प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले अॅड. सुरेंद्र गडलिंग आणि सुधीर ढवळे या दोघांनीही गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यात आयोगासमोर झालेल्या सुनावणीच्यावेळी साक्ष देण्यास नकार दिला होता.
या आयोगाचे कामकाज सध्या मुंबई येथे सुरू असून शनिवारी (११ जानेवारी) माजी खासदार जोगेंद्र कवाडे यांची आयोगासमोर उलटतपासणी होणार असल्याचे आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी सांगितले. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणात एकबोटे यांच्याविरूद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून मिलिंद एकबोटे जामिनावर आहेत.