Breaking News : दिल्ली विधानसभेच्या निवडणूक लागल्या , ८ फेब्रुवारीला मतदान , ११ फेब्रुवारीला निकाल

अखेर दिल्ली विधानसभा निवडणुका लागल्या आहेत. घोषित कार्यक्रमांनुसार दिल्ली विधानसभेची निवडणूक ८ फेब्रुवारीला होणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासूनच लागू करण्यात आली आहे. एकाच टप्पात होणाऱ्या या निवडणुकीकडे अर्थातच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारी रोजी संपत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीत १३७५० पोलिंग बूथवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १४ जानेवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक अर्ज २१ जानेवारीपर्यंत दाखल करता येणार आहे. तर, २२ जानेवारी रोजी निवडणूक नामांकन अर्जाची छाननी करण्यात येणार असून २४ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान ८ फेब्रुवारी रोजी होणार असून ११ फेब्रुवारी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.
मागील निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला होता तर भाजपला केवळ तीन जागांवर यश मिळाले होते. काँग्रेसला तर या निवडणुकीत खातंही उघडता आलं नवहतं . राज्यात सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचे सरकार अनेक कारणांनी चर्चेत राहिले. नायब राज्यपालांशी निर्णय घेण्यावरून वाद झाले होते. तर, केंद्र सरकार कामात अडथळा आणत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा केला होता. दिल्लीतील जनतेची विकासाखाली फसवणूक झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर, राज्यात शिक्षण, आरोग्य क्षेत्रात प्रचंड सुधारणा झाली असल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. यंदाच्या निवडणुकीत ‘आप’ला भाजपचे आव्हान असणार असून काँग्रेस आपली कामगिरी सुधारण्याचे प्रयत्न करणार आहे.