दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काय बोलले केजरीवाल ?

मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम्ही काम केलं असेल तरच मतदान करा. अन्यथा मतदान करू नका, असं आवाहन दिल्लीकरांना केलं आहे. विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी हे आवाहन केलं आहे. यंदा लोक पहिल्यांदाच सकारात्मक मतदान करतील. दिल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीकर सकारात्मक मतदान करतील. यावेळी आम्ही कामाची तुलनाही करणार आहोत. तसेच भाजपवाल्यांकडूनही मतं मागणार असून काँग्रेसवाल्यांकडेही मतं मागणार आहोत, असं केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले कि , आम्ही काम केलं असेल तर तुम्ही आम्हाला मतदान करा. जर आम्ही काम केलं असेल तर आम्हाला दुसऱ्यांदा सरकार बनवण्याचा अधिकार पोहोचतो, असं केजरीवाल यांनी सांगितलं. आम्हाला घाणेरडं राजकारण करायचं नाही. आम्हाला दिल्लीचा विकास करायचा आहे. त्यासाठी आम्हाला दिल्लीकरांनी सहकार्य करायला हवं. दिल्लीकरांनी झालेल्या कामाच्या, विकासाच्या आधारेच मतदान करावं. आमची पूर्ण निवडणूक मोहीम सकारात्मक असेल, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. दिल्लीत पोलीस, पालिका आणि डिडिए सांभाळण्याची जबाबदारी भाजपची आहे. आम आदमी पार्टीकडे पाणी पुरवठा महामंडळ आणि पीडब्ल्यूडीसह इतर विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे भाजप आणि आपमध्ये कुणी चांगलं काम केलं हे लोक पाहिलंच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
केजरीवाल यांच्या या प्रतिक्रियेवर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही तात्काळ प्रतिक्रिया दिली असून त्यांनी म्हटले आहे कि , केजरीवाल यांची बहानेबाजी चालणार नाही. आम आदमी पक्ष सर्वच आघाडीवर अपयशी ठरला आहे. त्यामुळे दिल्लीतील जनता आता भाजपसोबत असून दिल्लीत भाजपचा विजय होणार यात कोणतीही शंका नाही, असं सांगतानाच दिल्लीची निवडणूक कामाच्या आधारे पार पडेल. खोटेपणा आणि भूलथापांवर ही निवडणूक होणार नाही, असा टोलाही जावडेकर यांनी लगावला आहे.