मातोश्रीवर आठ वर्षाच्या मुलीसह मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेला शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांना ताब्यात घेतले. पोलिसांनी शेतकऱ्यासह त्याच्या आठ ८ वर्षाच्या मुलीसोबतही ढक्काबुक्की केल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर एका शेतकऱ्यासोबत पोलिसांची अरेरावी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले देशमुख हे पनवेल येथील शेतकरी असून आपल्या शेती कर्जासंदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी ‘मातोश्री’वर आले होते. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी देशमुख यांनी ‘मातोश्री’त प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मातोश्रीवर आलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याला सोडण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आहेत. तसेच शेतकऱ्याचे काय काम आहे, याबाबत विचारपूस करण्यास सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुख नावाचे शेतकरी आपल्या समस्या घेऊन पनवेलहून मुंबईत आले होते. त्यांच्यासोबत त्यांची आठ वर्षांची मुलगीही होती. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असून बँक त्यांची अडवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, तरीसुद्धी बँक अडवणूक करत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. याच संदर्भात एक फाईल घेऊन देशमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री बाहेर आले होते. मात्र, दोन-तीन तास मातोश्रीबाहेर थांबूनही देशमुख यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही. त्यामुळे त्यांनी मातोश्रीच्या आत जाऊ देण्याची विनंती पोलिसांना केली. ही विनंती नाकारत पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केली. देशमुख आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी धक्काबुक्कीही केली.