जाणून घ्या राज्यात सुरु होत असलेल्या शिव भोजनाच्या अति आणि शर्थी

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने आपल्या आश्वासनाची पूर्तता करीत १० रुपयात थाळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिल्यानंतर त्याच्या नियम व अति काय असतील ? याची माहिती देण्यात आली आहे. ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यासाठी तीन महिन्यांमध्ये ६ कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसंच या थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ मूद भात आणि १ वाटी वरण देण्यात येणार आहे. परंतु ही थाळी खाण्यासाठी काही अटी शर्थींचं पालनही करावं लागणार आहे.
दरम्यान, १२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात केवळ १८ हजार थाळ्या मिळणार आहेत. तर मुंबई आणि मुंबई उपनगराला मिळून १९५० थाळ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
अशा आहेत अटी शर्थी ?
सादर भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असणार असून भोजनालय केवळ दुपारी १२ ते २ या कालावधीतच सुरु राहील. या कालावधीत भोजनालयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची असेल. यासाठी भोजनालय चालवण्यासाठी सदर मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असणे आवश्यक आहे. सदर भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई असेल.
भोजनालयात एका वेळी किमान २५ व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान ७५ आणि कमाल १५० थाळी भोजन उपलब्ध होईल.
महाराष्ट्र राज्य शासनाने यासंदर्भात अध्यादेश जरी केला असून त्यानुसार सध्या राज्यभरात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येणार आहे. शहरी भागांमध्ये प्रतिथाळी ५० रूपये तर ग्रामीण भागांमध्ये प्रतिथाळी ३५ रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. शहरी भागांमध्ये २ चपात्यांसाठी १० रूपये, १ वाटी भाजीसाठी २० रूपये, १ वाटी वरणासाठी १० रूपये आणि१ मूद भातासाठी १० रूपये असे एकूण ५० रूपये ठरवण्यात आले आहेत. परंतु ग्रामीण भागात पुरवण्यात येणाऱ्या थाळीबद्दल मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही.