प्रत्येक शाळेत हनुमान चालीसा आणि गीता पाठ शिकवा , कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये शिकल्यामुळे मुले गोमांस खातात , केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा शोध

मोदी सरकारच्या मंत्री मंडळातील केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. “आपण मुलांना मिशनरींच्या शाळेत शिकवतो त्यामुळे ते पुढे जाऊन गोमांस खातात ” असे गिरिराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
गिरिराज सिंह यांनी गोमांस खाण्याचा संबंध थेट कॉन्व्हेन्ट शाळांशी जोडल्यामुळे वाद होण्याची चिन्हे आहेत. या शाळांऐवजी मुलांना इतर शाळांमध्ये शिकवणे गरजेचे असल्याचे ही त्यांचे म्हणणे आहे. कॉन्व्हेन्टच्या शाळांमध्ये शिकल्याने मुले आयआयटीत जाऊन इंजिनिअर होतात आणि परदेशात जाऊन तिकडे गोमांस खायला शिकतात असा दावाही त्यांनी केला आहे.
गिरिराज सिंह म्हणाले की, “शाळांमध्ये मुलांना भगवतगीता शिकवायला हवी. मात्र, आपण आपल्या मुलांना मिशनरींच्या शाळांमध्ये टाकतो. त्यानंतर ते आयआयटीमध्ये शिकतात, इंजिनिअर होतात. नंतर परदेशात जातात आणि यांच्यापैकी बहुतेक जण गोमांस खातात, का? कारण आपण त्यांना आपली संस्कृती आणि पारंपारिक मुल्ये शिकवत नाही.”
गिरीराज यांच्या मतानुसार प्रत्येक शाळांमध्ये गीतेचा पाठ शिकवणे गरजेचे आहे. शाळांच्या संस्थापकांचा ज्या देवावर अपार श्रद्धा आहे. त्या देवाची एक मुर्तीही शाळांमध्ये स्थापित करायला हवी. त्याचबरोबर शाळांमध्ये दररोज प्रार्थना आणि श्लोक पठण व्हायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे हनुमान चालिसा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला हावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.