वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर भेट

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट घेतली आहे. ‘या बैठकीत २६ डिसेंबर रोजी दादर टी टी भागात जे आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत, ते आंदोलन शांततापूर्ण मार्गाने व्हावे. सीएए आणि एनआरसी संदर्भात कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये या संदर्भात चर्चा झाली,’ असा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यावेळी आंबेडकर-ठाकरे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. येत्या २६ डिसेंबर रोजी वंचितने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्याची माहिती घेण्यासाठी ठाकरे यांनी आंबेडकर यांना भेटीचं निमंत्रण दिले होते असे सांगण्यात येत आहे.
‘एनआरसीमुळे हिंदूंमधलाही ४० % समाज भरडला जाणार आहे. भटका विमुक्त समाज हा १२ ते १६% आहे. आदिवासी समाज हा ९ % आहे. आलुतेदार बलुतेदार या सर्वांकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाहीत. त्यामुळेएनआरसी ज्यावेळी लागू होईल त्यावेळी तुमचा जन्म कधी झाला? याचं कागदपत्र मिळणार नाही. म्हणून मुसलमानांसोबतच इथला हिंदूही भरडला जाणार आहे. त्याविरोधा आम्ही २६ डिसेंबरला धरणा आंदोलन करणार आहोत,’ अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , ‘आर एस एस आणि बीजेपी कडून प्रचार सुरू आहे की हा कायदा फक्त मुस्लिमांसाठी आहे. पण ते तसं नसून हिंदूही इफेक्टेड आहे. भटके विमुक्त ११० वर्षे डिटेनशन कँम्प मध्ये राहिलेले . आदिवासींच्या सेक्टर मध्ये ब्रिटीश जाऊ शकले नाहीत. या विविध हिंदू समाजाच्या समस्यांबद्दल चर्चा झाली. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानंतर आज दुपारी १ वाजता या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत भीमा कोरेगावमधील शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एल्गार परिषदेबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय.
भीमा-कोरेगावची लढाई म्हणून इतिसाहास प्रसिद्ध असलेल्या या लढाईतल्या विजयाला १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी कोरेगाव भीमा याठिकाणी मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर सरकारकडून एल्गार परिषदेचे आयोजन करणाऱ्या लेखक आणि साहित्यिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबतही प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.