महाविकास आघाडीच्या कर्जमाफीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीवर टीका करताना म्हटले आहे की, हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. पण त्यांनी शब्द फिरवला. केवळ दोन लाखांची कर्जमाफी देऊन या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसाही दिला नाही.
विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या घोषणेवर जोरदार टीका केली.
राज्यात राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी शेतकऱ्यांना ८ हजार रुपयांची मदत केली. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना हात दिला. त्याकाळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना तातडीने प्रत्येकी २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिला नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची आणि त्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी सातत्याने केली होती. मात्र ठाकरेंनी शब्द फिरवला. दोन लाखांपर्यतची कर्जमाफी जाहीर केली. पण या कर्जमाफीचे कोणतेही डिटेल्स या सरकारने दिले नाहीत. त्यात पीक कर्जाचा समावेश आहे का? ट्रॅक्टर कर्जाचा समावेश आहे का? याचीही माहिती नाही. ही घोषणाच संभ्रम निर्माण करणारी आहे, असे सांगतानाच दोन लाखात सातबारा कोरा होतो का? दोन लाखात कर्जमुक्ती होते का? आणि शेतकरी चिंतामुक्त होतो का? असे प्रश्नही त्यांनी केला.