Nagpur : मुख्यमंत्र्यांचे सभागृहातील भाषण काळ्या दिवसासारखे , शेतकऱ्यांचा अपमान करणारे : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना केलेले भाषण विधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच झोंबले. यावर आपली प्रतिक्रिया नोंदविताना फडणवीस म्हणाले कि , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केवळ आपल्या खुर्चीचा विचार करत आहेत. आज देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काही उत्तर देखील दिलेले नाही. आपली खुर्ची वाचवण्यासाठी त्यांची कवायत चालू आहे. आपल्या बाजुला बसलेले पक्ष कसे खुश राहतील, त्यांचे मन कसे राखले जाईल, याचा विचार ते करत आहेत, म्हणूनच आम्ही सभात्याग केला. आजचे मुख्यमंत्र्यांचे सभागृहातील भाषण काळ्या दिवसासारखे आहे.
पुढे बोलताना फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला कि , ‘शेतकऱ्यांच्या हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत देण्याच्या आश्वासनाचे काय झाले? हे सराकर केवळ स्वत: चा विचार करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काहीही बोलत नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर जे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले तसे भाषण महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे भाषण हे आजच्या काळ्या दिवसारखे आहे, असा हल्लाबोल फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरेंचे भाषण हे सभागृहात नाही तर शिवाजी पार्कातील रॅलीत असते, असे ते भाषण करत आहेत. त्याचप्रमाणे हे शेतकऱ्यांचा अपमान करणारे सरकार आहे. पहिल्याच अधिवेशनात आपल्या शब्दांवरून सरकार पलटले आहे’, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.