त्र्यंबकेश्वरला पर्यटनासाठी गेलेले औरंगाबादचे तीन विद्यार्थी बुडाले, एकीचा मृतदेह सापडला, दोघे अद्याप बेपत्ता

औरंंंगाबाद : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पर्यटनासाठी गेलेले तीन विद्यार्थी दुगारवाडीच्या धबधब्याखाली बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. बुडालेल्या तिघापैकी एका मुलीचा मृतदेह बुधवारी (दि.१८) सकाळी मिळून आला. तर दोन अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनुषा (वय २१, रा.तेलंगना) असे मयत तरूणीचे नाव आहे. तर रघुवंशी (वय २१), कोटी रेड्डी (वय २०) दोघे रा.तेलंगना अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.
तेलंगना राज्यातील काही विद्यार्थी औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयात श्क्षिण घेत आहेत. मंगळवारी गिरीधर आकाश (वय २०), व्यंकटेश्वर रेड्डी (वय २०), अनुषा (वय २१),रघुवंशी (वय २१), कोटी रेड्डी (वय २०) सर्व राहणार तेलंगना, काव्या एल (वय २०, रा.हैदराबाद) हे विद्यार्थी पर्यटनासाठी म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दुगारवाडी येथील धबधब्याजवळ गेले होते. सायंकाळी उशिर झाल्याने तसेच पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही विद्यार्थी माघारी फिरले. त्यावेळी ग्रुपमधील अनुषा, रघुवंशी, कोटी रेड्डी हे तिघे परतले नव्हते. विद्यार्थ्यांनी बराचवेळ शोध घेवूनही तिघे मिळून आले नाहीत. त्यामुळे बुधवारी सकाळी विद्यार्थी व पोलिसांनी दुगारवाडी येथे पुन्हा एकदा सर्च मोहिम राबवली. त्यावेळी धबधब्याजवळील पाण्यात अनुषाचा मृतदेह मिळून आला. तर सायंकाळी उशिरापर्यंत रघुवंशी व कोटी रेड्डी यांचा तपास लागला नव्हता.
पाण्यात बुडालेल्या तिघांच्या नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली असल्याचे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सांगितले. बेपत्ता झालेल्या दोघांचा स्थानिक नागरीकांसह त्र्यंबेकश्वर पोलिस शोध घेत आहेत.