पाकिस्तानकडून कोणत्याही क्षणी नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जाऊ शकतो, भारतीय लष्कर जशास तसे उत्तर देण्यास सज्ज : बिपीन रावत

पाकिस्तानकडून कोणत्याही क्षणी नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जाऊ शकतो, पाककडून मोठी कारवाई होण्याची शक्यता असली तरी त्यांना जशास तसे उत्तर देण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे, असा ठाम विश्वास भारतीय लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केला आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना रावत म्हणाले कि , पाकिस्तानला नियंत्रित करण्याची गरज नाही. पाकिस्तान असा एक देश आहे. जो स्वतः संकटाकडे खेचला जात आहे. पाकिस्तानची सध्याची स्थिती अशी आहे की, तो स्वतः अनियंत्रित होत आहे. त्यामुळे पाकला कंट्रोल करण्याची गरज नाही. तो स्वतः डीकंट्रोल होत आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आम्हाला काही कारवाई करण्याची गरज भासणार नाही. तो स्वतः विनाशाच्या वाटेवर उभा आहे.
भारतीय लष्करप्रमुखांनी आज पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. सीमेवर परिस्थिती बिघडू शकते. परंतु, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर तयार आहे. नियंत्रण रेषेवर वारंवार पाकिस्तानकडून उल्लंघन होत असताना लष्करप्रमुखांचे हे वक्तव्य आल्याने रावत यांच्या इशाऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. ऑगस्ट महिन्यापासून गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा केंद्र सरकारने हटवला होता. त्यानंतर वारंवार गोळीबाराच्या घटना घडत आहेत.
दरम्यान भारतीय लष्कराने नुकतीच सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या ‘बॅट टीम’वर कारवाई केली होती. पाकिस्तान वारंवार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करीत आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात पाकिस्तानकडून ९५० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली होती. दरम्यान, लष्कर प्रमुख बिपीन रावत हे ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर लष्करप्रमुख पदाची सूत्रे ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहेत. नरवणे यांच्या रुपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहे.