मोठी बातमी : निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेबद्दलची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली , फाशी कायम

निर्भया प्रकरणातील आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केल्यानंतर दोन्हीही बाजू ऐकून घेत न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.
या प्रकरणातील एका आरोपीच्या पुनर्विचार याचिकेवर आज (बुधवारी) सुनावणी करण्यात आली . यावेळी पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आरोपीच्या वकीलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी तिहार तुरूंगाचे तुरूंग अधीक्षक सुनिल गुप्ता यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला त्यावर न्यायालयाने प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले कि, ट्रायल पूर्ण झाल्यानंतर यावर पुस्तक लिहिणं हा गंभीर ट्रेंड आहे. युक्तीवादाच्या दरम्यान आरोपीच्या वकीलांनी टेस्ट इन परेडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
दरम्यान, न्यायमूर्ती भानुमती यांनी हा मुद्दा ट्रायल दरम्यानही विचारात घेतला होता का? असा प्रश्न विचारला. यावेळी आरोपीच्या वकीलांनी हा नवा मुद्दा असल्याचं न्यायालयाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांना युक्तीवादासाठी अर्ध्या अर्ध्या तासाची वेळ दिली होती. देशामध्ये अनेक लोकांच्या फाशीच्या शिक्षा प्रलंबित आहे. अशात दया याचिकेसाठी अर्ज केल्यानंतरही फाशीच्या शिक्षेसाठी घाई का केली जात आहे, असा सवाल आरोपीच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला. तसेच या प्रकरणातील मुख्य साक्षीदारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत याप्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावेही विश्वास ठेवण्यासारखे नसल्याचा युक्तिवाद केला.
‘मी गरीब आहे म्हणून मला फाशीची शिक्षा दिली जात आहे’, असे दोषीने आपल्या वकीलांमार्फत न्यायालयाला सांगताना सर्व राजकीय अजेंड्यानुसार होत असल्याचे वकीलांकडून सांगण्यात आले. दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरोपींची पुनर्विचार याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिकाही रद्द केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोणताही उशिर न करता या प्रकरणाचा दिला पाहिजे. आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी मेहता यांनी न्यायालयाकडे केली.