काँग्रेसनेते राहुल गांधी यांचा पुतळा पेटवताना अभाविपचा कार्यकर्ता होरपळला

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं निषेध करण्यात आला. यावेळी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवताना एक कार्यकर्ता होरपळून जखमी झाला.
स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल निंदनीय वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात दोन आंदोलने झाली. सायंकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयासमोर अभाविप आणि नेशन फर्स्ट या संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले. सोहम कुराडे, श्रीनिवास सूर्यवंशी, राजसिंह माने यांच्यासह काही विद्यार्थी – विद्यार्थिनी यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा पेटवला. पेटलेल्या पुतळ्याला लाथ मारताना विशाल शिराळकर या कार्यकर्त्यांच्या पँटला आग लागली. जखमी झालेल्या विशाल याला बाजूला नेवून प्रथमोपचार करण्यात आले.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बिंदू चौक येथे सकाळी ११ वाजता राहुल गांधी माफी मांगो, गांधी यांचा धिक्कार असो, अशा निषेधाच्या घोषणा दिल्या. गांधी यांच्या निषेधाचे फलक यावेळी दाखवण्यात आले. नगरसेवक अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये , संघटन सरचिटणीस अशोक देसाई, देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव आदींनी टीका केली. क्रांतीकारकांच्या त्यागाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.