भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचे डॉ . नितीन राऊत यांचे आश्वासन

भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन राज्याचे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. कोरेगाव भीमा विजयस्तंभ परिसरातील प्रलंबित विकासकामांसंदर्भात हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा संघ कमिटी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अनुसूचित जाती विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, पुणे या संस्थांच्या प्रतिनिधींनी डॉ. राऊत यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी सुजित यादव, सर्जेराव वाघमारे, सचिन कडलक, गौतम आरकडे आदी उपस्थित होते.
भीमा कोरेगाव दंगलीनंतर नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, तसेच विजयस्तंभ परिसरात अतिरिक्त जागा मिळावी, परिसराच्या विकासासाठी दर वर्षी सुमारे १० कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा; तसेच सैनिकी शाळा, स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, निवासी व्यवस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, कोरेगाव भीमा युद्धाचे शिल्पचित्र उभारावे, विजयस्तंभ व कोरेगाव भीमा युद्धाबाबतचा धडा अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. त्यावर दंगलप्रकरणी भीम सैनिक व नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार, तसेच विजयस्तंभ परिसरातील विकासकामांसाठी बैठकीचे आयोजन घेणार, असे आश्वासन डॉ. राऊत यांनी दिल्याचे वाघमारे आणि यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.