राहुल गांधींनी देशातील सर्व महिलांचा अपमान केला – स्मृती इराणी

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत भाजपाच्या महिला खासदारांनी गोंधळ घातला. स्मृती इराणी यांच्यासोबत भाजपाच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. तसेच राहुल गांधी यांनी देशातील सर्व महिलांचा अपमान केला असल्याची टीकाही स्मृती इराणी यांनी केली आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य निंदनीय असून त्यांना यासाठी शिक्षा केली जाणार का? असा प्रश्न देखील स्मृती इराणी यांनी लोकसभेत उपस्थित केला, दरम्यान ‘आम्हाला न्याय हवा’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक सुरु आहे. विधानसभा निवडणूक पाच टप्प्यांमध्ये पार पडणार असून गुरुवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी झारखंड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची प्रचारसभा पार पडली. राहुल गांधी यांनी प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींवर टीका केली. “ नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ ची घोषणा केली होती. पण आता ‘रेप इन इंडिया’ झाला आहे. भारतात आपण कुठेही पाहिले तर बलात्कार होत असल्याचे दिसत आहे.”
स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राहुल गांधी यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करून देशातील समस्त महिलांचा अपमान केला असल्याचेही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांचे हे वक्तव्य नींदनीय आहे आणि त्यांना याबाबत शिक्षा झाली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनी गुरूवारी झारखंडमध्ये एका रॅलीला संबोधित केले होते. त्यावेळी बोलताना ‘मेक इन इंडिया’ आता ‘रेप इन इंडिया’ झाल्याचे ते म्हणाले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ या वक्तव्यावरून हा गदारोळ पहायला मिळाला.
झारखंड पासून उत्तर प्रदेशपर्यंत कुठेही पाहा, बलात्काराच्या घटना वाढत आहेत. भाजपाचे एक आमदारही बलात्काराच्या खटल्यात आरोपी आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावरही काही बोलत नाहीत. पंतप्रधान ‘बेटी बचाव’चा नारा देतात. परंतु कोणापासून मुलींचे संरक्षण करायचे हे सांगत नाही. त्यांना भाजपाच्या आमदारांपासून वाचवण्याची गरज आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. राज्यभेतीलही काही सदस्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी सभागृहात घोषणाबाजी केली. जी व्यक्ती या सभागृहाची सदस्य नाही त्याचे नाव तुम्ही घेऊ शकत नाही. कोणीही सभागृहाची शांतात भंग करू नये, असं यावेळी सभापती व्यंकय्या नायडून यांनी सदस्यांना सांगितले.