रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिकांवर गुरुवारी सुनावणी

राम जन्मभूमी वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकांवर गुरुवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात दुपारी १.४० वाजल्यापासून चेंबरमध्ये याचिकांवरील सुनावणीस सुरुवात होणार आहे. दरम्यान, निर्मोही आखाड्याने देखील ९ नोव्हेंबर रोजी फेरविचार याचिका दाखल केली आहे. ही याचिका राम जन्मभूमीसंदर्भातील निर्णयावर नाही; तर शैबियत अधिकार, ताबा आणि मर्यादेबाबतच्या निर्णयावर या याचिकेद्वारे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमीयत उलेमा ए िहंद यांनीही फेरविचार याचिका दाखल केल्या आहेत. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठानं सर्वसंमतीनं अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जमीन राम लल्ला पक्षकारांना दिली होती. तसेच अयोध्येतच एका प्रमुख स्थानी मशिदीच्या निर्माणासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर विवादित जमीन देण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते.
जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद अशहद रशीदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयावर पहिली फेरविचार याचिका २ डिसेंबर रोजी दाखल केली होती. या याचिकेत १४ मुद्द्यांवर फेरविचाराचा आग्रह धरण्यात आला आहे. बाबरी मशिदीच्या पुनर्निमाणाचे निर्देश देत या प्रकरणात ‘पूर्ण न्याय’ मिळू शकतो, असं या याचिकेत म्हटलं आहे.