समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रिमंडळांच्या बैठकीत मंजूर

समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रिमंडळांच्या बैठकीत मान्य झाला असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पुढची कारवाई पूर्ण करुन मागणी पूर्ण केली जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. या महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपाचा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढून या महामार्गाचे ‘ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
याबाबत माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले कि , “मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावा असा प्रस्ताव ठेवला आणि सर्वांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्राच्या विकासात बाळासाहेबांचे महत्त्वाचे योगदान आहे. बाळासाहेबांच्या संकल्पेतूनच गडकरींच्या मार्गदनाखाली मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तयार झाला होता. त्यामुळे गेमचेंजर ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव द्यावे अशी आमची भावना होती.”
सुमारे ५६ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि मुंबई-नागपूर या शहरांमधील ७१० किलोमीटरचा प्रवास सहा तासांवर आणणाऱ्या ‘समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तब्बल १२० मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या १० जिल्ह्य़ांतील २७ तालुक्यांच्या ३५० गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पातील भूसंपादनासह बहुतांश अडथळे दूर होऊन प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.