नागरिकत्व विधेयक : शिवसेनेमचा यु-टर्न, राज्यसभेत विधेयकाला विरोध

लोकसभेत सोमवारी शिवसेना सदस्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केले असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्याने शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेत या विधेयकावर शिवसेनेने जे प्रश्न उपस्थित केले त्यावर जोपर्यंत समाधानकारक स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत या विधेयकाला शिवसेना पाठिंबा देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. त्यामुळे शिवसेना राज्यसभेत या विधेयकाला विरोध करेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणले जाते, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी पहिल्या प्रथम बाहेर यायला पाहिजे. लोकसभेमध्ये सोमवारी मांडलेल्या विधेयकाबद्दल स्पष्टता नीट दिसत नाही. शिवसेनेने काल आपली भूमिका सामनाच्या अग्रलेखातून स्पष्ट केलेली आहे. या विधेयकावर अनेक प्रश्न देशाला पडले आहेत, ते आम्ही सभागृहात सुद्धा मांडले व सामनाच्या माध्यमातून जाहीरपणे सुद्धा मांडले. ज्या काही सुधारणा आम्ही लोकसभेत सुचवल्या आहेत, राज्यसभेत हे विधेयक येताना त्या सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत व यामध्ये अधिक स्पष्टता आली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
विधेयकाबाबत अनेक मुद्द्यांवर स्पष्टता होण्याची आवश्यकता आहे. जर या विधेयकाबद्दल नागरिकांच्या मनात काही भीती असेल तर त्यांची भीती दूर करण्याची आवश्यकता आहे. शेवटी ते या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. राज्यसभेत या विधेयकावर विस्तृतपणे चर्चा व्हावी, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. देशाची चिंता फक्त आपल्यालाच आहे असे जर भाजपला वाटत असेल तर तो भाजपचा भ्रम आहे, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
दरम्यान, महाराष्ट्रात भाजपविरुद्ध भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर भाजपची साथ दिल्याने त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या विधेयकाचे समर्थन करणाऱ्या सर्वच पक्षांना आज लक्ष्य केले होते. ज्यांनी या विधेयकाचे समर्थन केले ते सगळेच पक्ष देशाच्या मुळावर घाव घालत आहेत, असे राहुल यांनी नमूद केले होते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर दिलेले स्पष्टीकरण त्याला अनुसरूनच असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली असून शिवसेनेने लोकसभेत घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनीही आश्चर्य व्यक्त केले होते. शिवसेनेला तटस्थ राहता आले असते असे मत दलवाई यांनी व्यक्त केले होते.