Hyderabad Gang Rape and Murder : आरोपींच्या खात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या या भावना….

डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करून खात्मा करण्यात आल्यानंतर आरोपींच्या कुटुंबीयांना मोठा हादरा बसला . मुख्य आरोपी मोहम्मद आरिफच्या आईने ‘माझा मुलगा गेला’ अशी प्रतिक्रिया दिली. तर ‘जर माझ्या मुलाने गुन्हा केला असेल तर त्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे होती’, असे त्याचे वडील म्हणाले.
दुसरा आरोपी चिंताकुंता चेन्ना केशवुलूची पत्नीने संताप व्यक्त केला आहे. ‘पोलिसांनी मलाही मारून टाकावे. आता माझा पती मेला असून माझ्याकडे काहीही नाही.’ पत्रकारांशी बोलतांना तिने सांगितलं की, ‘मला सांगण्यात आलं होतं की, माझ्या पतीला काहीही होणार नाही. ते परत घरी येतील. मला माहिती नाही पुढे काय होणार होतं. पण, आता मला त्या ठिकाणी घेऊ जा, ज्या ठिकाणी माझ्या पतीला ठार मारलं.’
चिंताकुंता चेन्ना केशवुलूचं नुकतंच लग्न झालं होतं. आरोपी शिवचे वडील म्हणाले की, ‘माझ्या मुलाने गुन्हा केला असेल. पण त्याचा अंत असा नको व्हायला होता. अनेक जणांना बलात्कार आणि हत्या केल्यात. पण त्यांना असं मारण्यात आलं नाही. त्यांना असं का नाही मारलं?’
तेलंगाणामधील नारायणपेट जिल्ह्यातील जकलर गावातील 26 वर्षीय आरिफने ट्रक ड्रायव्हर होण्याआधी स्थानिक पेट्रोल पंपावर काम केलं होतं. तर आणखी एक आरोपी जोल्लू शिवा आणि जोल्लू नवीन कुमार हे दोघेही 20 वर्षांचे होते. दोघेही सफाई कामगार म्हणून काम करत होते आणि ते त्याच जिल्ह्यातील गुडीगंदला गावातील राहणार होते. तर चिंताकुंता चेन्ना केशवुलू (20) हा सुद्धा त्याच गावात राहणारा होता. त्याच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनीच्या आजाराने त्रस्त होता.