शीख दंगलीबाबत मनमोहन सिंग यांनी केला मोठा खुलासा

Ex-PM Manmohan Singh: When the sad event of '84 took place, IK Gujral ji went to the then HM PV Narasimha Rao&told him,situation is so grave that it's necessary for govt to call Army at the earliest. If that advice had been heeded perhaps '84 massacre could've been avoided.(4.12) pic.twitter.com/bQmnktnmem
— ANI (@ANI) December 4, 2019
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी १९८४ च्या शिख दंगलीबद्दल मोठा खुलासा केला आहे. मनमोहन सिंग यांनी म्हटलं की, जर तत्कालीन गृहमंत्री पीव्ही नरसिंह राव यांनी इंद्र कुमार गुजराल यांचा सल्ला ऐकला असता तर दिल्लीत झालेली शिख दंगल टाळता आली असती. गुजराल यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग बोलत होते.
मनमोहन सिंग म्हणाले की, दिल्लीत ज्यावेळी शिख दंगल उसळली होती तेव्हा इंद्रकुमार गुजराल तेव्हाचे गृहमंत्री नरसिंह राव यांच्याकडे गेले. त्यांनी राव यांनी परिस्थिती गंभीर असून सरकारने लवकर लष्कराला पाचारण करण्याची गरज असल्याचं सांगितलं. मात्र, तत्कालीन सरकारने गुजराल यांच्या सल्ल्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही.
इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये शिखविरोधी दंगली उसळल्या होत्या. देशात एकूण ३ हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. फक्त दिल्लीतच २ हजार जणांना प्राण गमवावे लागले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. दिल्लीतील अनेक भागात लूटीचे आणि हत्येच्या घटना घडल्या होत्या. दुकाने, घरे आणि गुरुद्वारात लूटमार केल्यानंतर आग लावण्यात आली होती. पाकिस्तानातून आलेल्या शिखांच्या वस्ती, झोपडपट्टी आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणांवर हिंसाचार झाला होता. काहींना जिवंत जाळल्याचे प्रकारही घडले होते.
या प्रसंगी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही गुजराल यांना आदरांजली वाहिली. काँग्रेसनं गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळं १९९८ मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत येण्याची संधी मिळाली होती, असं मुखर्जी म्हणाले. यावेळी त्यांनी गुजराल यांच्या परराष्ट्र धोरणाचंही कौतुक केलं. गुजराल हे २१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८ या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते.