Rajyasabha : येत्या ३० वर्षात मुंबई बुडणार ? या प्रश्नावर सरकारने दिले ‘हे’ अधिकृत उत्तर….

मुंबई पुढच्या ३० वर्षांत बुडणार, असा दावा अमेरिकेच्या एका संस्थेने केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. मुंबईला बुडण्याचा धोका असल्यामुळे साडेतीन कोटींपेक्षा जास्त लोकांना याचा फटका बसेल, असा या संस्थेतल्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या संस्थेने हे भाकित वर्तवल्यानंतर भारतात त्यावर बरीच चर्चा झाली आणि होते आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा फटका या महानगरीला बसणार का ? यावर ही चर्चा केली जात आहे.
मुंबई बुडणार का ? या मुद्द्यावर सरकारनेच राज्यसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. समुद्राची पातळी वाढण्याचा धोका असल्यामुळे मुंबईला मात्र बुडण्याचा धोका नाही, असा निर्वाळा देण्यात आला आहे. याबद्दल भारतीय वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा, असं सरकारने राज्यसभेत सांगितलं. राज्यसभेत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले कि , मुंबई पाण्याखाली जाण्याचा अंदाज परदेशातल्या काही मीडिया रिपोर्टसमध्ये वर्तवण्यात आला आहे पण मुंबई पूर्ण जलमय होण्याची कोणतीही चिंता नाही. २०४० – २०५० या काळात मोठा पूर येण्याची कोणतीही शक्यता नाही. हे भाकित वेगवेगळ्या माहितीच्या आधारे वर्तवण्यात आलं आहे त्यामुळे काळजीचे कारण नाही.
दरम्यान भारतीय शास्त्रज्ञांनी आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईच्या किनारपट्टी भागात समुद्राची पातळी ३.३३ सेमी ने वाढू शकते पण यामुळे हे महानगर बुडण्याचा धोका नाही. भारतात २००४ मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे मोठं नुकसान झालं होतं, याची आठवण संसदेत करून देण्यात आली. पण भारतातली हवामानाचे अंदाज वर्तवणारी यंत्रणा सक्षम आहे आणि देशाबाहेरच्या चक्रीवादळांबद्दलचे अंदाजही भारतीय संस्थांकडून वर्तवले जातात. त्यामुळे अशा धोक्यांचे अंदाज आणि माहिती आपल्याला मिळेल, असेही सरकारने म्हटले आहे. मुंबई हे शहर अतिधोका असलेल्या शहरांच्या यादीत येत नाही, अशी माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.