Rajyasabha : देशात किती आर्थिक घोटाळे झाले आणि किती हजार कोटींचा लागला चुना ? सरकारने दिले हे अधिकृत उत्तर

New Delhi: BJP member Anurag Singh speaks in the Lok Sabha, in New Delhi on Friday, Aug 3, 2018. (LSTV Grab via PTI) (PTI8_3_2018_000056B)
केंद्र सरकारने एका प्रश्नाचे उत्तर देताना वित्तीय घोटाळे करून देशाबाहेर पसार झालेल्या घोटाळेबाजांबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत असे ५१ घोटाळेबाज देश सोडून पसार झाले असून त्यांनी तब्बल १७ हजार ९०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) देण्यात आलेल्या तपशीलाच्या आधारे अुनराग ठाकूर यांनी सभागृहात बड्या घोटाळेबाजांची माहिती दिली. आतापर्यंत ६६ मोठे घोटाळे उघड झाले असून या प्रकरणांतील ५१ आरोपी फरार आहेत. हे सर्व आरोपी अन्य देशांत लपून बसले आहेत, असेही या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. या सर्वांनी मिळून एकूण १७ हजार ९४७.११ कोटी रुपयांचा अपहार केल्याचेही पुढे नमूद करण्यात आले आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या या प्रकरणांत कुणाला सवलत देण्यात आली आहे का?, कुणाचे कर्ज माफ करण्यात आले आहे का?, असे प्रश्न राज्यसभा खासदारांकडून उपस्थित करण्यात आले होते. त्यावर ईडी व सीबीआयकडून संबंधित न्यायालयांत ही प्रकरणं नेण्यात आली आहेत. या प्रकरणांची सखोल चौकशी तसेच अन्य कारवाईही सुरू आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
अनुराग ठाकूर पुढे म्हणाले कि , फरार आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले जात आहेत. संबंधित देशांशी संपर्क साधण्यात आला आहे. ही प्रक्रिया सध्या प्रलंबित आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक २०१८ अन्वये संबंधित न्यायालयात १० आरोपींविरुद्ध दावे दाखल केले आहेत. ८ आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत ईडीने विनंती अर्ज दाखल केले असून त्याआधारे इंटरपोलने या सर्वांना रेड-कॉर्नर नोटीस जारी केली आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.