वादग्रस्त महापोर्टल तत्काळ बंद करण्याची खा. सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

शासकीय नोकरभरतीत महापोर्टल हे डिजीटल व्यासपीठ मददगार न ठरता अडथळा ठरतं आहे. म्हणून ते बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील संवाद दौऱ्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर आमचं सरकार आलं की महापोर्टल बंद करू असं आश्वासन सुळे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मागील सरकारने शासकीय नोकर भरतीसाठी हे पोर्टल सुरू केलं होतं. पण यामध्ये पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करण्यात यावं अशी मागणी पत्राद्वारे सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ३६ हजार सरकारी जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया सुरू केली होती. सरकारच्या महा आयटी विभागाच्या महापरीक्षा पोर्टल माध्यमातून तलाठी पदासाठी १८०९ जागांसाठी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकालही जाहीर झाला. या परीक्षेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. १८ लाखांची बोली एक तलाठी पदासाठी लागली अशी चर्चा यावेळी होती.
हे पोर्टल बंद व्हावं ही राज्यभरातील युवांची मागणी आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने बंद करून पूर्वीप्रमाणे परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यामुळे आता राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, आरे कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच प्रकरणात आता दुसरा मोठा निर्णय घेतला आहे.