आयकर विभागाच्या धाडीत सापडले तब्ब्ल चार हजार कोटींचे घबाड …

देशात नेहमीच काळ्या बाजारातील पैशाची चर्चा केली जाते हि नित्याचीच बाब असली तरी दिल्ली एनसीआरमधील एका रिअल इस्टेट ग्रुपकडे तब्बल ४ हजार कोटी रुपये इतकं काळ्या पैशांचं घबाड आढळलं असल्याचं वृत्त आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत ही बाब उघड झाली असून ही संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स) दिली आहे.
ज्या कंपनीकडे हे तीन हजार कोटींचं घबाड आढळून आलं आहे , बांधकाम क्षेत्रातील त्या कंपनीचं नाव गुप्त ठेवण्यात आलं असलं तरी ओरिएंटल इंडिया ग्रुपकडे हे घबाड सापडलं असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. गेल्याच आठवड्यात ओरिएंटल इंडिया ग्रुपच्या २५ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. इन्फ्रास्ट्रक्चर, मायनिंग आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांमध्ये या ग्रुपचे मोठे नाव आहे.
सीबीडीटीने कारवाई करण्यात आलेल्या ग्रुपकडे रोख रकमेची जी नोंद होती त्यात २५० कोटी इतका काळा पैसा असल्याचे स्पष्ट झाले. ही संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली. या ग्रुपने अनेक मालमत्तांच्या व्यवहारांवरील करही अदा केलेला नाही. सुमारे ३.७५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपने ३ हजार कोटी रुपये इतकं काळं धन असल्याची कबुली चौकशीत दिली आहे. छापेमारीच्या कारवाईनंतर संबंधित ग्रुपचे विविध बँकांतील ३२ लॉकरही सील करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून अधिकृतपणे देण्यात आली आहे.