मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दुसरा मोठा निर्णय , आरे पाठोपाठ ‘ नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याचे आदेश

‘ आरे ‘ आंदोलकांना दिलासा दिल्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हेही मागे घेण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला मोठया प्रमाणात विरोध होता. या प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवर तत्कालिन सरकारने गुन्हे दाखल केले होते. नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्पातील आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपने मात्र या प्रकल्पाची पाठराखण केली होती.
मार्च २०१८ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी संघर्ष समितीला गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात हे गुन्हे मागे घेतले नव्हते. आता मात्र उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असून दोन दिवसातील त्यांचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’तील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.
दरम्यान मेट्रो कारशेडसाठी आरेतील २६४६ झाडे तोडण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगली जुंपली होती. झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही आरेमध्ये कारशेड नको, अशी भूमिका घेत या प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. याप्रकरणात आरेतील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे.