हैद्राबाद पाठोपाठ तामिळनाडूच्या कोइम्बतूरमध्येही अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

हैद्राबाद आणि रांची येथील बलात्काराच्या घटने नंतर तमिळनाडूच्या कोयंबतूरही एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सहा जणांनी एका मुलीला जबरदस्तीने ओढून नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या नराधमांनी त्याचा व्हिडीओही बनवला असल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे संताप निर्माण झाला असून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी केलीय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोयंबतूरच्या ईश्वरया नगर भागात हि घटना घडली आहे. पीडीत मुलगी ही ११ व्या वर्गात शिकत होती. रात्री ८ वाजता ती आपल्या मित्रासोबत बाहेर जात होती. त्यावेळी सहा जणांच्या एका टोळक्याने त्यांना अडवून मुलीच्या मित्राला मारहाण केली. त्यानंतर त्या मुलांनी तिला जवळच्या एका पार्कमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्याचा व्हिडीओही तयार केला.
या टोळक्याने मुलीच्या मित्राचेही कपडे उतरवले आणि त्याचाही व्हिडीओ तयार केला. घटनेनंतर मुलीने आपल्या कुटुंबीयांना सर्व घटना सांगितली आणि त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. पोलिसांनी तपास करून काही तासांमध्येच घटनेत सहभागी असलेल्या ६ पैकी ४ आरोपींना अटक केलीय. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सर्व आरोपी हे २१ ते ३० या वयोगटातले असून त्यांच्या विरुद्ध धमकी देणं आणि मारहाण करणं असे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.