गोडसेभक्त खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांची अखेर संसदेत माफी , भाजपने झटकले अंग , पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासही केला प्रतिबंध

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आणि भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लोकसभेत मोठा गोंधळ सुरू झाला होता . भोपाळमधून खासदार झाल्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांचा अनेकदा तोल सुटल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच नथुराम गोडसे हा देशभक्त होता, विधान थेट संसदेतच केले त्यामुळे भाजपची अडचण झाली होती या वक्तव्यामुळे ठाकूर यांच्यावर देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. अखेर या पार्श्वभूमीवर आज साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत माफी मागितली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांना पुन्हा ‘देशभक्त’संबोधणाऱ्या भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि भाजप यांच्यावर टीका होत आहे. याच कर्णावरून प्रज्ञासिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सल्लागारपदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर यांनी संसदेत केलेले कथित वक्तव्य अत्यंत निंदनीय असून भाजप अशा विचारधारेचे समर्थन करत नाही, असे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितले आहे. प्रज्ञासिंह यांना आता भाजपच्या संसदीय बैठकीतही सहभागी होता येणार नसल्याचेही नड्डा यांनी सांगितले आहे.
खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी बुधवारी लोकसभेत एका चर्चा सत्रात महात्मा गांधींची हत्या करणारे नथुराम गोडसे यांन देशभक्त संबोधले होते. त्यावरून लोकसभेत एकच गदारोळ झाला होता. याआधीही लोकसभा निवडणूक सुरू असतानाही गोडसेला देशभक्त संबोधले होते. प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
दरम्यान उत्तर प्रदेशातले भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनीही अशीच वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. आता त्यांनी नथुराम गोडसेबद्दल साध्वींनी केलेल्या वक्तव्याची री ओढली. साध्वी प्रज्ञासिंह यांनी मुंबई हल्ल्यातले शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करून राळ उडवून दिली होती. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे एकच गदारोळ झाला होता. साध्वी प्रज्ञा यांची संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या सल्ल्गारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावर मोठी टीका झाली. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर संसदीय समितीमधून त्यांना काढून टाकण्यात आलं आहे.