Aurangabad : शिर्डीला जाणा-या चार भाविकांवर काळाचा घाला, भरधाव कार झाडाला धडकून ४ जण ठार, २ जण गंभीर जखमी

औरंंंगाबाद : शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी जात असलेल्या चार तरूण भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर धडकून झालेल्या भिषण अपघातात ४ जणांचा करूण अंत झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात शनिवारी (दि.३०) पहाटे २ वाजेच्या सुमारास औरंगाबाद ते नगर रोडवरील गोलवाडी फाट्याजवळ घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता वसंतराव डांगे (वय २७), अमोल नंदकिशोर गव्हाळकर (वय २२), आकाश प्रकाश मोरे (वय २७), अक्षय सुधाकर शिलवंत (वय २६) सर्व रा. सेवली, जि.जालना अशी अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर किरण संजय गिरी (वय २५), संतोष भास्कर राऊत (वय २३), रा. सेवली, जि.जालना अशी जखमींची नावे आहेत. सहाही तरूण शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी किरायाची कार क्रमांक (एमएच-२१-व्ही०५८१) घेवून जात होते. औरंगाबाद नगर रोडवरील गोलवाडी फाट्याजवळ असलेल्या योग सिमेंट कंपनी समोर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जावून धडकली.
या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच छावणी पोलिस ठाण्याचे जमादार ए.एस.वामने, पी.एस.आडसूळ यांनी आपल्या कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सहाही युवकांना पोलिसांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले असता, डॉक्टरांनी दत्ता डांगे, अमोल गव्हाळकर, आकाश मोरे, अक्षय शिलवंत यांना तपासून मयत घोषीत केले. तर संजय गिरी याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून संतोष राऊत याच्यावर घाटी रूग्णालयता उपचार करण्यात येत आहेत.
हा अपघात इतका भिषण होता की, कारच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस करंत आहेत