मुंबई -पुणे महामार्गावर भीषण अपघात , चौघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’वर रायगड जिल्ह्यातील रसायनीजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि गॅस टँकरचा भीषण अपघात झाला आहे. त्यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर कार (एमएच ११ सीएच १८८९) विवाहानिमित्ताने सजविण्यात आल्याचे दिसत होते. सातारा येथून लग्नसमारंभ उरकून हे कुटुंबीय मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला. भरधाव असलेल्या या कारनं मागच्या बाजूनं टँकरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या कारचा अक्षरश: चुराडा झाला. त्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. दोघे गंभीर जखमी आहेत. स्थानिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्वीफ्ट डिझायरमध्ये एकूण पाच महिला आणि एक पुरुष प्रवास करत होते. यापैकी तीन महिला तर एक पुरुषाचा अपघातात जागेवरच मृत्यू झाला आहे तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील स्वीफ्ट गाडीवर पालवे तसेच मेटकरी या नावाचे लग्न संबंध असल्याचे स्टिकर लावण्यात आले होते. चालकाचं भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट गॅस टँकरला धडकली. बोनेटसह कारचा चुराडा झाला. अपघातानंतर जवळपास अर्धा किलोमीटर अपघातग्रस्त वाहन टँकरने फरफटत नेल्याने मृतांचा आकडा अधिकच वाढला. महामार्ग पोलीस तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीला सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन महामार्गावरून बाजुला करण्यात आलं. रसायनी पोलीस अपघाताचा अधिक तपास करत आहेत.