छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख , पत्रकारांनाही चुटकी वाजवत बोलणाऱ्या मोदी सरकारच्या कायदेमंत्रांच्या अकलेचे दिवाळे …

केंद्रीय विधी व न्याय मंत्री श्री रवी शंकर प्रसाद आपण आधी तमाम शिवभक्तांची माफी मागा.
आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार या देशात कुणालाच नाही. pic.twitter.com/A6481BOEuk
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 23, 2019
महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करण्यासाठी भाजपचे कायदेमंत्री यांनी दुपारी एक पत्रकार परिषद आयोजित करून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करीत आज आपल्या अकलेचे दिवाळे काढले. रविशंकर प्रसाद यांचा बोलण्याचा तोरा आणि ताठाही असा होता कि , ते पत्रकारांशी बोलताना अक्षरशा: चुटक्या वाजवून नेक्स्ट नेक्स्ट असे बोलत होते. दरम्यान या प्रकरणात खा. संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
या षटकार परिषदेत बोलताना रविशंकर म्हणाले कि , ‘देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच महायुतीला बहुमत मिळालं होतं. पण निवडणुकांचे निकाल आल्यानंतर शिवसेना कुणाच्या इशाऱ्यांवर इतकी आक्रमक झाली? शरद पवारांचं आणि काँग्रेसचं म्हणणं होतं की त्यांना विरोधात बसण्याचा जनादेश होता. मग खुर्चीवर बसण्याचं मॅच फिक्सिंग कसं झालं?’ पुढे ते म्हणाले कि , ‘शिवसेनेने शिवाजीचे (महाराजांचे ) नाव घेऊन बोलू नये’, पुढे पुन्हा त्यांनी छत्रपती शिवाजी (महाराज ) असा पुन्हा एकेरी उल्लेख करीत आपली मग्रुरी दाखवली. यावेळी त्यांनी ‘भाजप नक्कीच बहुमत सिद्ध करेल’, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरून शिवसेनेला टोला लगावला. ‘आता असं म्हटलं जात आहे की लोकशाहीची हत्या करण्यात आली. शिवसेना स्वार्थी हेतूमुळे ३० वर्षांची युती तोडून विरोधी विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडी करते, पण जेव्हा देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा मात्र समस्या निर्माण होते. हे नवीन सरकार राज्याला स्थिर सरकार देईल. विरोधकांचा देशाच्या आर्थिक राजधानीवर मागच्या दाराने ताबा मिळवण्याचा कट होता’, असं रवीशंकर प्रसाद यावेळी म्हणाले.
‘जे बाळासाहेब ठाकरेंचे आदर्श जिवंत ठेऊ शकत नाहीत, त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंचा प्रामाणिक काँग्रेस विरोध सगळ्यांना माहिती आहे. सत्तेसाठी तडजोड करणाऱ्यांनी शिवाजी (महाराजांबद्दल ) बद्दल बोलू नये’, असं देखील रवीशंकर प्रसाद म्हणाले.
खा . संभाजी महाराजांची मागणी
रवीशंकर प्रसाद यांनी तातडीने माफी मागावी, अशी जाहीर मागणी संभाजीराजेंनी पत्राद्वारे केली असून कोणत्याही राजकारण्यांनी शिवरायांचं नाव बदनाम करू नये, असे आवाहनही त्यांनी सर्वपक्षीयांना केले आहे. आपल्या ट्विटमध्ये खा. संभाजीराजेंनी म्हटले आहे कि , केंद्रीय विधी व न्याय मंत्री श्री रवी शंकर प्रसाद आपण आधी तमाम शिवभक्तांची माफी मागा. आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार या देशात कुणालाच नाही. आजकालच्या आचार आणि विचार शून्य राजकरण्यांनी महाराजांचं नाव राजकारणात वापरू नये अशीही सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तात्काळ अन बिनशर्त माफी मागावी.