थेट दिल्लीहून : पवार आणि मोदी यांच्या बैठकीत काय चर्चा झाली ?

महाराष्ट्राचे लक्ष सध्या दिल्लीतील घडामोडींवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यां नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून जवळपास ४५ मिनिटं ही बैठक सुरु होती. यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची नरेंद्र मोदी यांना दिली असून लवकरात लवकर मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना राज्यपालांनी जाहीर केलेली आठ हजार कोटींची मदत अपुरी असून अद्याप ती मिळाली नसल्याचं सांगितलं. हेक्टरी किमान ३० हजारांची मदत दिली जावी अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली. तसंच २०१२-१३ ला आम्ही हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत दिली होती अशी माहिती त्यांनी नरेंद्र मोदींना दिली.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांसोबत बैठक सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांना बोलावून घेतलं होतं. तसंच शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या बैठकीत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात महाराष्ट्रातील सत्तापेचावरही चर्चा होईल असं सांगितलं जात होतं. शरद पवार यांनी मात्र बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं आहे.
शरद पवारांनी नरेंद्र मोदींना दिलेल्या पत्रात लिहिलं आहे की, “मी दोन जिल्ह्यांचा दौरा करत नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करत माहिती घेतली आहे. पण अवकाळी पावसाची झळ संपूर्ण महाराष्ट्राला बसली आहे. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचाही समावेश आहे. मी यासंबंधी सविस्तर माहिती घेत असून तुमच्याकडे लवकरात लवकर पाठवून देईन”.
“राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने तुम्ही तात्काळ मध्यस्थी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही तात्काळ पावलं उचललीत तर मी तुमचा आभारी असेन,” असंही शरद पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.