Bad News : मच्छर अगरबत्तीमुळे गेला जोडप्याचा जीव…

उत्तर प्रदेशातील बरेलीमधील सुभाषनगरमध्ये शुक्रवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेत मच्छर अगरबत्ती ब्लॅँकेटवर पडून लागलेल्या आगीमध्ये एका जोडप्याचा जळून मृत्यू झाला. . पप्पू आणि रजनी अशी मृतांची नावे आहेत. मच्छर पळवण्यासाठी ही अगरबत्ती घरामध्ये लावली जाते. पप्पू रिक्षा ओढण्याचे काम करतो. पप्पू आणि रजनी गाढ झोपेमध्ये असताना ही घटना घडली. त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. घराला आतून कडी लावलेली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पोलिसांनी मृत्यूचे कारण शोधून काढण्यासाठी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या पाहणीमधून मच्छर अगरबत्ती ब्लँकेटवर पडून आग लागल्याचा निष्कर्ष काढला आहे. पप्पू आणि रजनी भाडयाच्या छोटयाशा खोलीत राहत होते. घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. मागच्या वर्षभरापासून पप्पू आणि रजनी सुभाषनगरमधील या भाडयाच्या घरात राहत होते. त्यांचा मुलगा मुकेश हापूर येथे राहायला असून त्याचा त्याच्या पालकांशी कुठलाही संपर्क नव्हता.
“या जोडप्याच्या घरी फारसे कोणाचे येणे-जाणे नव्हते. ते एकत्र दारु सुद्धा प्यायचे” अशी माहिती असे घरमालकीण ओमवती यांनी दिली. “मध्यरात्रीच्या सुमारास आम्हाला बन्सी नागला कॉलनीतील घराला आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचलो. अग्निशमन दलाच्या गाडीने आग विझवली. जोडप्याचे कोणाबरोबरही शत्रुत्व नव्हते. घर आतमधून बंद होते” अशी माहिती सुभाषनगरच्या एसएचओने दिली. “मुलाशी संपर्क होऊ न शकल्यामुळे पप्पूच्या मोठया भावाकडे दोन्ही मृतदेह सोपवले. प्रथमदर्शनी मच्छर पळवणाऱ्या अगरबत्तीमुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसत आहे. शवविच्छेदन अहवालातून काही संशायस्पद आढळले तर नक्की त्या दिशेने तपास करु” असे एसएचओने सांगितले.