महाराष्ट्राचे राजकारण : दिल्ली दरबारी सोनिया गांधी -शरद पवार यांच्यात उद्या चर्चा , नव्या पर्यायाबाबत होणार फैसला !!

राज्यातील सत्तास्थापनेचे वेध शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागले असून या प्रवेशभूमीवर काल पुढे ढकलण्यात आलेली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बैठक उद्या होणार आहे . या भेटीनंतर मंगळवारी राज्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र बसून पर्यायी सरकार निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
आज पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. मलिक पुढे म्हणाले कि , आजच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. त्यामुळे राज्यात पर्यायी सरकार निर्माण झालं पाहिजे, असा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. आम्ही राज्यात काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढलो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काँग्रेससोबत चर्चा केली जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल. त्यानंतर मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांची मुंबईत बैठक होईल. या बैठकीत पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
राष्ट्रवादीच्या आज झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित होते.