Mumbai : बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसैनिकांच्या घोषणा

शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गेलेले भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहून कार्यक्रमाचे औचित्य न लक्षात न घेताच संतप्त शिवसैनिकांनी फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी ‘मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी शिवतीर्थ दणाणून सोडला.
शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले असताना भारतीय जनता पक्षाच्या मात्र एकही नेत्याने शिवतीर्थावर हजेरी लावलेली नव्हती. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी शिवतीर्थावर येत याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतींना अभिवादन केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हात जोडून प्रसारमाध्यमांशी न बोलताच निघून गेले.. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
देवेंद्र फडणवीस बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर आल्याचे दिसताच शिवसैनिकांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात ‘मी पुन्हा येईन’च्या घोषणा दिल्या. भाजप-शिवसेना युती देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच तुटल्याचे शिवसैनिक मानतात. शिवाय फडणवीस यांनीच दिलेला शब्द पाळला नाही, उलट त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला असे शिवसैनिक मानतो. या मुळेच शिनसैनिकांनी ‘मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…. मी पुन्हा येईन…’ अशा घोषणा देत फडणवीस यांचा निषेध केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.