चर्चेतल्या बातम्या : हत्ती गेला आणि शेपूट राहिले … सोमवारी सोनिया-शरद पवार -उद्धव ठाकरे यांच्याच चर्चा

शिवसेनेने भाजपशी काडीमोड करून काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत सरकार बनविण्याची मोहीम सध्या अंतिम टप्प्यात असल्याने हत्ती गेला शेपूट राहिले असेच म्हणावे लागेल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे हे हे हाती घेतलेले कार्य सोडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला जाणे हे सर्व काही फायनल झाल्याचेच प्रतीक आहे. दरम्यान चर्चा अशीही आहे कि , राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत.
राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत ५०-५० च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे. अर्थात हि अफवाही असू शकते कारण या सगळ्या माध्यमातल्या बातम्या आहेत . दरम्यान काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी असून बसल्याची बातमी प्रसार माध्यमांनी ठोकून दिली होती त्यावर स्वतः काँग्रेस नेत्यांनीच सांगितले कि केवळ अफवा आहे . त्यामुळे वाचकांनी केवळ मनोरंजन म्हणून या बातम्यांकडे पाहण्याची हि वेळ आहे.
येत्या सोमवारपासून दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत असून, त्याच्या पूर्वसंध्येला शरद पवार सोनिया गांधींची भेट घेऊन सरकार स्थापनेविषयी माहिती देतील, असे वृत्त आहे. प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेसने सत्तेत सामील व्हावे, अशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला; तसेच राज्यातील काँग्रेसचे नेते आणि आमदारांनाही वाटते. त्याविषयीही पवार-सोनिया यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. पवार-सोनिया बैठक रविवारी दुपारी तीन वाजता होईल असे सांगितले जात असून या बैठकीला राज्यातील काँग्रेस; तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.
राज्यात सरकार स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन सोनिया गांधी यांची सदिच्छा भेट घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत झालेल्या चर्चेचा अहवाल; तसेच किमान समान कार्यक्रम आणि सत्तेच्या वाटपाविषयीच्या बोलणीतील प्रगतीची माहिती काँग्रेसचे नेते अहमद पटेल उद्या सोनिया गांधी यांना देणार असल्याचे समजते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा झाल्यानंतरच शिवसेनेशी सरकार स्थापनेविषयी चर्चा करायची अशी भूमिका उभय पक्षांनी घेतली होती.