महाराष्ट्राचे राजकारण : चर्चासत्रांचे गुऱ्हाळ आणि आरोप-प्रत्यारोपांचे बाण चालूच ….नवे सरकार बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे !!

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये चर्चांचे गुऱ्हाळ चालूच असून भाजप -सेनेच्या नेत्यांचे आरोप -प्रत्यारोपांचे बाणही चालूच आहेत. तूर्त बातमी एवढीच आहे कि , शिवसेना -काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात गेल्या तीन दिवसांपासून सत्ता स्थापनेच्या संदर्भात बैठकांचे सत्र चालू आहे. शिवसेना महायुतीतून बाहेर पडल्यानंतर भाजपाला बाजूला ठेवून सत्तेचे नवे समीकरण तयार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घेतलेल्या परिश्रमाला फळ येत असून लवकरच महाराष्ट्राला नवे सरकार मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शिवसेनेवर असहकार्याचा ठपका ठेवून आधी भाजपने नंतर पुरेशा वेळेअभावी शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्रात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागली आहे. दरम्यानच्या काळात पुरेसा वेळ असल्याने नवीन सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत बसून राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपापल्या सूत्रांवर चर्चा करीत आहे. प्रारंभी काँग्रेस नेतृत्वाने शिवसेनेसोबत सरकार बनविण्यास नाखुषी जाहीर केली होती परंतु पक्षाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या आग्रहामुळे काँग्रेसने तत्वतः शिवसेनेसोबत सरकार बनविण्यास संमती दिली असली तरी नव्या सरकारला बाहेरून पाठिंबा द्यायचा कि थेट सत्तेत सहभाग घायचा यावरून काँग्रेसमध्ये बराच खल झाला आहे .
दरम्यान काँग्रेसने थेट सत्तेत सहभागी व्हावे म्हणून पवारांना पुन्हा पक्ष नेतृत्वाचे मन तयार करावे लागले . त्यानुसार तीन पक्षात सत्तेची वाटणी कशी राहील ? यावर कालपासून बठक होत आहेत. यामध्ये सकृतदर्शनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद विभागले जाणार असल्याचे वृत्त आहे तर काँग्रेसने सलग पाच वर्षे उपमुख्यमंत्रीपद घ्यावे असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे . परंतु काँग्रेसमधून त्याला संमती मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसकडे सभागृहाचे अध्यक्षपद आणि काही मंत्रीपदे देण्याच्या बाबतीत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
दुसरी बातमी काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना भाजप युतीच्या बाबतीत बरेच खुलासे केले त्यात एक तर अडीच आधीच वर्षाचे मुख्यमंत्री पद यावर कुठलेली कमिटमेंट नव्हती तसेच बंद दारा आड झालेल्या चर्चा बाहेर करण्याची आमची संस्कृती आणि सभेत नाही असे शिवसेनेला सुनावले होते त्यावर आज शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात उत्तर देताना म्हटले आहे कि , ज्या खोलीत चर्चा झाली ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि मंदिरात झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तरतो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे. बंद दाराआड झालेल्या गोष्टी प्रत्यक्षात अमलात न आल्याने त्या चव्हाट्यावर आल्या. प्रचाराच्या सभेत उद्धव ठाकरे सुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे सांगत होते. याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले.
हा कलगी तुरा असाच रंगात राहिला तरी त्याला आता कुठलाही अर्थ नाही, हेच खरे आहे . आता नव्या सत्ता समीकरणांची बातमी ऐकण्यास लोक उत्सुक आहेत .