महाराष्ट्राचे राजकारण : काँग्रेस -राष्ट्रवादींसोबत चर्चा योग्य दिशेने , लवकरच योग्य तो निर्णय : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray after meeting with Congress leaders: Discussions have started, whatever decision will be taken we will inform soon. #MaharashtraGovtFormation pic.twitter.com/YWkRm2ttPe
— ANI (@ANI) November 13, 2019
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सरकार कधी स्थापलं जाईल याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला तेव्हा योग्य वेळी निर्णय सर्वांना समजेल असं उद्धव ठाकरेंनी एवढं एका ओळीचं उत्तर दिलं आहे. काँग्रेस नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक संपली. वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंची काँग्रेस नेत्यांशी चर्चा सुरु झाली. जी चर्चा काही वेळापूर्वीच संपली असून लवकरच योग्य निर्णय जाहीर करु असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट कालपासूनच लागू झाली आहे. असं असलं तरीही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाने सत्ता स्थापनेसाठी असमर्थतात दाखवल्यानंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली. २४ तासांची मुदत शिवसेना पाळू शकली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीला मुदत देण्यात आली. मात्र राष्ट्रवादीची मुदत पूर्ण होण्याआधीच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणारं पत्र पाठवलं. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भात निर्णय घेतला आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
दरम्यान राज्याच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येत असून कालच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली हे बरंच झालं आम्हाला सहा महिन्यांची मुदत मिळाली इतके दयावान राज्यपाल सगळ्या राज्यांना मिळोत असा टोला लगावला. यानंतर आज दिवसभरात सकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडली. आता शिवसेना नेते विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर हे दोघेही काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांसोबतची बैठक संपल्यानंतर त्यांनी बाहेर आल्यावर चर्चा योग्य दिशेने सुरु असून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे.