महाराष्ट्राचे राजकारण : राष्ट्रवादीनंतर काँग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा , असे असेल सत्ता वाटपाचे सूत्र

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर महाराष्ट्रात निर्माण होत असलेल्या सत्ता समीकरणातील शिवसेना आपल्या दोन नव्या भिडूंशी चर्चा करीत आहे . या चर्चेनुसार शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री तर सलग पाच वर्षे काँग्रेसचा उपमुख्यमंत्री राहील अशी मागणी असल्याचे वृत्त आहे . दरम्यान रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात चर्चा झाली.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जवळपास एकमत झाले असून शिवसेनेशी कसे जुळवून घ्यायचे, याबाबत सध्या वाटाघाटी सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जु खर्गे व वेणूगोपाल यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवसेनेकडे केवळ दोन आमदार अधिक असल्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत सेनेबरोबर सामान वाटा राहील असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे.
सेनेशी आघाडी करताना नेमकं कसं पुढं जायचं, यावर त्यांच्यात खल झाला. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये अहमद पटेल यांची भेट घेतली. त्यांच्यात संभाव्य आघाडीतील सत्तावाटपाबाबत चर्चा झाल्याचं वृत्त आहे . या चर्चेत तिन्ही पक्षांच्या या आघाडीतील प्रत्येकाला महत्वाची पदे वाटून घेण्याचे ठरले आहे .