Nagpur Court : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील खटल्याची ११ नोव्हेंबरला सुनावणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रातील मुद्यांवर प्रश्न उपस्थित करून दाखल केलेल्या तक्रारीविरोधात शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. या प्रकरणात न्यायालयाने याचिकाकर्ते अॅड. सतीश उके यांचे म्हणणे ऐकूण घेतले असून पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ४ मार्च १९९६ आणि ९ जुलै १९९८ रोजी दोन फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फडणवीस यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयातून जामीन घेतला होता. वर्ष २०१४ च्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ, नागपूरच्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करण्यात येणाऱ्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी दोन फौजदारी गुन्हे/प्रकरणाची माहिती दिली नाही असा आक्षेप घेण्यात आला होता.
याविरोधात अॅड. उके यांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही यचिका संबंधित न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने फेटाळली होती. परंतु १ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्याविरुद्ध खटल्याची सुनावणी घ्यावी असा निर्णय दिला. त्यानंतर आता प्रथम श्रेणी न्यायदंडाधीकारी न्यायालाने सुनावणी सुरू केली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.