आदर्श आचार संहितेचे जनक माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी . एन . शेषन यांचे निधन

आदर्श आचार संहितेचे जनक आणि देशात खऱ्या अर्थाने निकोप निवडणुकांचे पर्व सुरू करून देशातील निवडणूक प्रचार पद्धतीला कमालीची शिस्त लावणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांचे आज दीर्घ आजारानं चेन्नईत निधन झाल्याचे वृत्त आहे. मृत्यूसमयी ते ते ८५ वर्षाचे होते.
गेल्या काही वर्षांपासून टी.एन. शेषन यांना स्मृतिभ्रंशाचा त्रास होता. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या वृद्धाश्रमात ठेवले आहे. तीन वर्ष वृद्धाश्रमात घालविल्यानंतर ते घरी आले. मात्र घरात करमत नसल्याने ते संपूर्ण दिवस वृद्धाश्रमातच घालवत. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या शेषन यांनी राहत्या घरी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाने प्रामाणिक आणि कर्तव्य दक्ष प्रशासक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
निवडणूक प्रणालीत पारदर्शकता आणण्याचं आणि निवडणूक प्रक्रिया बदलण्याचं सर्व श्रेय शेषन यांनाच जातं. तीन-चार टप्प्यात मतदान घेण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. मतदारांसाठी ओळखपत्र तयार करण्याची कल्पनाही त्यांनीच मांडली होती. शेषन हे १९९० मध्ये निवडणूक आयुक्त बनले होते. १९९० ते १९९६ पर्यंत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कारभार सांभाळला होता.
निवडणूक पद्धतीत कमालीची शिस्त आणल्याबद्दल त्यांना १९९६ मध्ये मॅगसेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या विरोधात राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता.