अयोध्या निकाल : गल्ली ते दिल्ली Live : कुठे काय चाललंय ? देशभर कडेकोट सुरक्षा व्यवस्था …

राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादाचा निकाल येण्यास सुरूवात झाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उद्या (१० नोव्हेंबर) सकाळी ११ वाजेपर्यंत लागू असणार आहे.
योध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीतील केशव कुंज परिसरात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डाचे प्रतिनिधींचीही अशोक रोड येथे संवाद साधणार आहे.
अयोध्येचा खटला राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील असल्याने निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश गोगोई यांनी अयोध्या तसेच, संपूर्ण उत्तर प्रदेशमधील सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्या नंतरच निकालाचा दिवस निश्चित केला. शनिवार-रविवारी न्यायालयाचे कामकाज बंद असते. पण, अयोध्या खटल्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शनिवार निकाल देण्याचे ठरवले. शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी न्या. गोगोई यांची भेट घेऊन त्यांना कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली होती.
अयोध्येमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून कलम 144 लागू करण्यात आला आहे. सर्व राज्यांमध्ये अलर्ट पाठवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवस शाळा-कॉलेज बंद राहतील. अयोध्येमध्ये रामलला दर्शनावर कोणतीही बंदी नाही. कर्नाटक, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि दिल्ली सुद्धा शनिवारी शाळा बंद राहतील. उत्तर प्रदेशच्या अलीगड आणि मुजफ्फरनगरमध्ये तर राजस्थानच्या भरतपूर आणि जयपूर जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद, जैसलमेरमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. गोवा, उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये कलम 144 लागू, बंगळुरुमध्ये सकाळी 7 ते रात्री 12 पर्यंत कलम 144 लागू राहणार आहे.
एडीजी उत्तर प्रदेश पोलिस आशुतोष पांडे यांनी सांगितले की, पॅरामिलिट्री दल, आरपीएफ आणि पीएसी च्या 60 तुकड्या आणि 1200 पोलिस तैनात आहेत. 250 पोलिस उपनिरीक्षक, 20 डिप्टी एसपी, 2 एसपी तैनात आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 35 सीसीटीव्ही आणि 10 ड्रोन लावण्यात आले आहेत.
गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, इंटेलिजेंस ब्यूरो प्रमुख अरविंद कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शनिवारी दुपारी 1 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काहीही असो, हा कुणाचा विजय किंवा पराभव असणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.