गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा मागे घेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरून खळबळ

मोदी सरकारकडून गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा हटविण्याचे वृत्त आल्यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला असून या निर्णयाच्या विरोधात कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. एसपीजीच्या ऐवजी गांधी परिवाराला आता झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. मोदी सरकारचा हा एक कट असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसकडून देण्यात आले आहे. या निर्णयामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचेही काँग्रेसने म्हटलं आहे. गृह मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेबाबतचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर एसपीजी हटवल्यानंतर आता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या सुरक्षेसाठी झेड प्लस श्रेणीची सुरक्षा असेल, ज्यात सीआरपीएफ कमांडो तैनात असतील. आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच एसपीजी सुरक्षा असेल. कारण, आतापर्यंत फक्त चार जणांनाच एसपीजी सुरक्षा होती, ज्यात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचाही समावेश होता. सर्व सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या तपशीलाच्या आधारावरच एसपीजी काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. गृह मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, गांधी कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा हल्ला किंवा धमकीची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळेच सरकारने एसपीजी काढण्याचा निर्णय घेतला.
एसपीजीच्या तुकडीमध्ये अत्यंत उच्च प्रशिक्षित कमांडो, आधुनिक उपकरणे, वाहने, स्नायपर्स आणि बॉम्ब विरोधी पथकाचाही समावेश असतो. अत्याधुनिक शस्त्र, अंधारातही पाहता येईल असे काळे चष्मे, बुलेटप्रूफ जॅकेट आणि गुडघ्यांवर लावण्यात येणारे गार्डही कमांडोंकडे असतात. एसपीजीच्या अत्याधुनिक वाहनांच्या ताफ्यामध्ये BMW 7 सीरिज, रेंज रोवर्स, BMW 7 एसयूव्ही, टोयोटा आणि टाटाचीही वाहने असतात.