फडणवीस -ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसची प्रतिक्रिया , राज्यपालांच्या निर्णयांनंतर आम्ही भूमिका जाहीर करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसनेही पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय प्रतिक्रिया दिली . काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले कि , देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी राज्यपाल आता काय निर्णय घेतात, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यपालांच्या निर्णयानंतरच आम्ही भूमिका घेऊ. यावरून काँग्रेसने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे.
दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांनी आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मीडियासमोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन्याचं निमंत्रण स्विकारण्यासाठी राज्यपालांना भेटायला गेलेत असं आम्हाला वाटलं होतं. महायुतीला जनादेशही होता. पण फडणवीस यांनी राजीनामा दिला, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्र्यांचं त्यानंतरच निवेदन आम्ही ऐकलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदही आम्ही उत्सुकतेने ऐकली, असं थोरात म्हणाले.
आमच्याकडे आकडा नाही. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावर चर्चाही केली नाही. तसेच पुढे काय करायचं याची निश्चित रणनीतीही तयार केलेली नाही. आमचं सर्व लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागलेलं आहे. राज्यपाल काय भूमिका घेतात यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यानंतरच आम्ही पुढचा निर्णय घेऊ, असं ते म्हणाले. इतर राज्यांमध्ये सर्वात मोठा पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी येत नसेल तर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं जातं. तशी कायदेशीर प्रक्रिया आहे. राज्यपालांनी ही प्रक्रिया पाळायला हवी, असं त्यांनी सांगितलं. बिगर भाजप सरकार यावं ही आमचीही इच्छा आहे. पण ती कल्पना कशी सत्यात उतरेल? असा सवालही त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही राज्यपालांच्या निर्णयानंतरच भूमिका घेऊ असं सांगितलं.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणले कि , देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील अस्थिरता संपुष्टात आली आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच त्यांना जनतेने नाकारलं आहे. राज्यात २२० ते २२५ जागा जिंकू असा दावा त्यांनी केला होता. हा दावा फोल ठरल्याचं त्यांनी आज १५ दिवसानंतर कबूल केलं आहे. आता तोडाफोडी करूनही राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, हे फडणवीस यांना कळून चुकलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यपालांनी आता कारभार हाती घेणं अपेक्षित आहे. राज्यात आता काळजीवाहू सरकार राहणार की राष्ट्रपती राजवट लागू होणार असा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.