Maharashtra Delhi News Update : पवार -सोनिया भेट : सोनिया म्हणाल्या “पुन्हा भेटू …” , अद्याप पाठिंबा नाही , शिवसेनेने मागितलाच नाही : पवार

काल पासून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सोनिया गांधींना भेटणार आणि महाराष्ट्रातील पाठिंब्याची भूमिका जाणून घेणार असेच सांगितले जात होते . दुसरेकडे खा. संजय राऊत आपल्याकडे १७०-१७५ आमदार आहेत असे सांगत होते . या सर्व पार्श्वभूमीवर पवार दिल्लीला जाणार आणि शिवसेनेच्या बाजूने मतदान करण्याचा काँग्रेस आमदारांना जणू सोनियांचा “व्हिप ” च घेऊन येणार असे चित्र रंगविले जात होते परंतु असे काहीच झाले नाही .
कारण पवार साहेब त्या इराद्याने दिल्लीला गेलेच नव्हते , त्यांच्या इतर नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांचा हा नियोजित दौरा होता. तसे खास प्रयोजन नव्हते. सोनियांना भेटण्यासाठी ते असेच गेले . त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीची माहिती द्यायची होती. शिवसेनेचा विषयच नव्हता. कारण पवार साहेब म्हणतात …
त्यांची पाठिंब्यावरून शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांची काही चर्चा झालीच नाही . त्यांच्याकडून तसा कुठलाही प्रस्ताव त्यांच्याकडे आला नाही . काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना सांगितले म्हणून ते सोनिया गांधी यांना भेटले .
काय म्हणाल्या सोनिया गांधी ?
पवार म्हणाले त्या काहीही म्हणाल्या नाही . महाराष्ट्रातील परिस्थितीवर चर्चा केली . मग पाठिंबा कुणाला देणार ? ते म्हणतात आमचे तसे काहीही ठरले नाही . आणि आम्हाला कुणी पाठिंबाही मागितला नाही. मग संजय राऊत १७०-७५ चा आकडा कसा सांगतात त्यावर पवार म्हणाले मला माहित नाही , त्यांचे काय गणित आहे ?
शिवसेनेला पाठिंबा द्यायला तुम्ही त्यांना राजकीय अस्पृश्य समजता काय ? असे विचारले असता ते म्हणाले आम्ही त्यांचे विरोधक आहोत त्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढविली आहे . आणि त्यांनी आम्हाला पाठिंबाही मागितला नाही. भाजप -सेनेने मिळून सरकार बनवावे असा सल्लाही त्यांनी दिला . आणि आमच्याकडे आकडेही नाहीत असेही ते म्हणाले.
थोडक्यात ते म्हणाले कि , काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींबरोबर झालेल्या चर्चेत शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही. पण भविष्यात काय घडेल ते आता सांगू शकत नाही.
शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देणार का ? या प्रश्नावर त्यांनी उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झालेली नाही. त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री बनणार या चर्चेलाही पवारांनी पूर्णविराम दिला. आपण मुख्यमंत्री बनण्याचा प्रश्नच येत नाही असे शरद पवारांनी स्पष्ट केले. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना-भाजपाची आहे.
मी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची माहिती दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सध्या राज्यात भाजपाला अनुकूल स्थिती नसल्याचेही शरद पवार म्हणाले. आम्ही पुन्हा भेटणार असून त्यानंतर तुम्हाला नेमके सांगू शकेन असेही शरद पवार म्हणाले. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती होती.